एका अचूक क्षणी मनुष्याला आपल्या व्यक्तीगत जीवनाबाहेरच्या जगाची जाणीव होते. या संवेदनशीलतेमधून प्रवास सुरू होतो आणि समाजभानाच्या कर्तव्यातून स्वत:च्याच जाणीवेचे क्षितीज विस्तारत जाते. समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे या जाणीवेतून 7 ऑक्टोबर 1935 रोजी कै. विष्णू गणेश बेनाडीकर यांनी या शाळेची स्थापना केली. गुणवत्तापूर्ण शाळा या आकांक्षेला मनी ठेवून त्यांनी श्रीराम विद्यालय रुपी बीज श्रध्देनं लावलं व त्यास खंबीरपणे साथ दिली ती त्यांच्या पत्नी कै. प्रमिलादेवी विष्णू बेनाडीकर यांनी. शाळा स्थापनेचा हा संकल्प जरी आनंदाचा / स्वागताचा असला तरी त्या काळात तो समर्थपणे तडीस नेणे निश्चितच सोपा नव्हता. सेवा , त्याग व तपश्चर्या यातून उभयतांनी शाळेला आपलं अपत्य म्हणूनच वाढवलं, जेापासलं. अखंड धडपड असीम कष्ट करुन शाळा नावारुपाला आणली. गुणवत्तेवर भर देणारी शाळा म्हणून आजही हा नावलौकीक टिकून आहे. सन 1960 मध्ये शाळेची पहिली विद्यार्थिनी कु. भारती रा. पिळणकर शासकीय स्कॉलरशीप परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकली. आजही ही परंपरा टिकून आहे व उत्तरोत्तर ती वाढतच राहीली आहे.
काळाची पावले वेळीच ओळखून वेळोवेळी त्यामध्ये सकारात्मक बदलही करण्यात आले. मुलांच्या बाहेरच्या जगाची पहिली ओळख म्हणजे त्यांचा बालवाडीत झालेला प्रवेश. प्रशिक्षित शिक्षक वर्ग, मुबलक सेवक वर्ग, मुबलक शैक्षणिक साहित्य व डिजीटल शिक्षणाची जोड यामुळे श्रीराम बालकमंदीराच्या माध्यमातून दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यास आम्ही सफल झालो.
राजारामपुरी परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी ‘श्रीराम विद्यालय’ शाळेची इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेते. शाळेमध्ये अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वर्ग, डिजीटल प्रशिक्षण सुविधा, शाळाबाहय स्पर्धा परीक्षेची तयारी, सुसज्ज संगणक वर्ग, ग्रंथालय, पुरेसे शिक्षकेतर कर्मचारी, मराठी माध्यमातही इंग्रजी भाषेसाठी विशेष प्रयत्न, शालेय व सहशालेय मुबलक उपक्रम, पालक मेळावे, व्याख्यात्यांचे आयोजन यामुळे शाळेची गुणवत्ता व तिचा नावलौकिक उत्तरोत्तर वाढतच आहे.
आज विविध क्षेत्रांमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी देश परदेशात उच्चपदस्थ स्थान भूषवित आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सजगता व सकारात्मक प्रयत्न यातून आम्ही आपल्या पाल्यांसाठी दर्जेदार शिक्षण प्राप्त करुन देण्यास कटीबध्द आहोत.